Sunday, July 21, 2019


जाहीर आभार

कोकणच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा पालटून टाकणाऱ्या रिफायनरीला परत आणण्यासाठी कधी नव्हे एवढ्या उत्साहाने कोकणवासी रत्नागिरीत एकत्र येऊन भव्य मोर्चामध्ये सहभागी झाले. कोकणातील जनतेची प्रकल्पविरोधी अशी प्रतिमा या सकारात्मक आंदोलनाने पुसून टाकली आहे आणि चांगल्या संधी घेऊन येणाऱ्या प्रकल्पांचे येथील जनता स्वागतच करते हा संदेश सर्वत्र पोहोचविला आहे. कोणीतरी उभ्या केलेल्या निराधार भीतीला बळी न पडण्याचा निर्धारही या मोर्चाद्वारे व्यक्त झाला आहे आणि व्यापक हिताचे मुद्दे घेऊन येणाऱ्यांना जनतेने भरभरून साथ दिली आहे,  'कोकण विकास समिती'तर्फे समस्त कोकणवासीयांची आभार मानण्यात येत आहेत. प्रकल्प समर्थनार्थ शनिवारी आयोजित केलेल्या मोर्चाला आलेल्या यशामुळे हजारो तरुण हातांना रोजगाराची संधी देणारा हा प्रकल्प त्याच ठिकाणी उभारण्याबाबत शासनाकडूनही सकारात्मक पावले उचलली जातील असा विश्वासही समितीने व्यक्त केला आहे. 

कोकण विकास समितीतर्फे मागील १५/२०  दिवस  ग्रीन रिफायनरीच्या पुनर्स्थापनेसाठी विविध सामाजिक संस्थांच्या मार्फत समाज प्रबोधन करण्यात आले.याचे फलित म्हणून दि. २० जुलै रोजी काढण्यात आलेल्या   बिगर राजकीय विराट मागणी मोर्चा मध्ये सहभागी होऊन सर्व कोकणी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोर्चाच्या कालावधीत उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेऊन समस्त व्यापारी बांधवांनी, बांधकाम व्यावसायिकांनी, रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवगड येथील शहरी आणि ग्रामीण जनतेने तसेच विविध सामाजिक संस्थांनी आणि ज्ञाती संघटनांनी आपला सहभाग नोंदवला. कामानिमित्त मुंबईत राहत असलेले अनेक लोक खास या मोर्चात सहभागी होण्यासाठी रत्नागिरीत आले. प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्राखालील शेतकऱ्यांनी सर्व दबाव झिडकारून  हजारोंच्या संख्येने हजेरी लावली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागही लक्षणीय ठरला. आपल्या अभूतपूर्व सहभागाने रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच विरोधासाठी नाही तर काही मागण्यासाठी निघालेला हा अभूतपूर्व प्रचंड मोर्चा यशस्वी केला त्याबद्दल  सर्वांचे मनःपूर्वक आभार आम्ही मानत आहोत.  

प्रकल्पाच्या पुनर्स्थापनेसाठी सुरु केलेले हे आंदोलन पूर्णतः सनदशीर मार्गाने पार पडायचे आहे. कोणताही आक्रमकपणा न दाखवता आपले म्हणणे मोठ्या पाठबळासह मांडता येते हेही जनतेने या मोर्च्यात स्वयंशिस्त आणि स्वच्छता पाळून सिद्ध केले. रत्नागिरी शहरातील माळनाका  येथील पादचारी पुलावरून काही रत्नकन्यांनी आंदोलकांवर पुष्पवृष्टी केली, यावरून सामान्य जनतेमध्ये किती मोठ्या प्रमाणावर सकारात्मक जाणीव रुजली आहे ते दिसून येते. ही सकारात्मक भावना आता कोकणवासीयांमध्ये वाढीस लागेल असा विश्वास आम्हाला वाटतो. जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने या सनदशीर प्रयत्नांची योग्य दखल घेऊन संपूर्ण सहकार्य दिले तसेच सर्व प्रसार माध्यमांनी अतिशय उत्तम प्रसिद्धी दिल्याबद्दलही  आम्ही त्यांचे आणि समस्त नागरिकांचे जाहीर आभार मानत आहोत.  

सर्व कार्यकर्ते,

कोकण विकास समिती

Wednesday, July 17, 2019

'नाणार पाहिजेच' मोर्चाला भरपूर प्रतिसाद

   व्यापाऱ्यांनी ठेवली दुकाने बंद
   
   पादचारी पुलावरून झाली पुष्पवृष्टी
   
   संपूर्ण बिगर राजकीय आंदोलन 
   

रिफायनरी झालीच पाहिजे अशी मागणी करत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलेल्या नाणार समर्थकांच्या मोर्च्याला जिल्ह्यातील विविध व्यावसायिक आणि जनसंघटनाचे भरपूर पाठबळ मिळाल्याचे पाहायला मिळाले. मोर्च्याला मिळालेला प्रतिसाद पाहून हाकालपट्टी होत असलेलै तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे स्वागत करणाऱ्यांची संख्याही दखल घेण्याएवढी मोठी असल्याचे सिद्ध झाले. विविध व्यावसायिक संघटनांबरोबरच कोणत्याही संस्था-संघटनेशी थेट संबंध नसलेल्या सामान्य शेतकऱ्यांची मोर्च्यातील उपस्थिती लक्षणीय होती. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा या मोर्च्याच्या आयोजन आणि नेतृत्वात काहीही संबंध नव्हता. जवळजवळ साडेतीन हजार नागरिक या मोर्च्यात सहभागी झाले होते.

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या मागणी मोर्चाचा प्रारंभ रत्नागिरी येथील मारुतीमंदिर या महत्त्वाच्या ठिकाणापासून झाला. मोर्च्याच्या अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला द्यावयाच्या निवेदनाचे जाहीर वाचन प्रवक्ते अविनाश महाजन यांनी केले. या निवेदनात प्रकल्पाच्या प्रस्तावांपासून आजवर घडलेला इतिहास थोडक्यात स्पष्ट करण्यात आला असून प्रकल्पाविषयीचे गैरसमज व त्यांचे खंडन, अशा प्रकल्पना असणारी कोकणभूमीची अनुकूलता आणि प्रकल्प रद्द करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार जमीन उपलब्ध करून देण्यास पुढे येणाऱ्यांची माहिती या बाबी तपशीलवार लिहलेल्या होत्या. प्रकल्प उभारणीपूर्वी झालेल्या जनसुनावणीत लोकांनी होकार दिल्यानंतर मुंबईस्थित पर्यावरणाच्या ठेकेदारांनी विरोधाची बीजे पेरण्यास कशी सुरुवात केली आणि विद्ववत्तेचा आव आणत प्रकल्पाच्या धोक्यांबाबत लिहिणारा प्रत्यक्षात खंडणीखोर कसा निघाला याची माहिती देण्यात आली आहे.

या मोर्च्याला रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील लोक स्वेच्छेने आले होते. त्यांमध्ये व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, औषध विक्रेते, कर सल्लागार, मच्छीमार, लघु उद्योग, सुवर्णकार, गॅरेज व्यावसायिक, प्लम्बर यांच्या संघटना तसेच काही ज्ञातिसंघटना, सेवाभावी संस्था आणि स्वतंत्रपणे आलेल्या नागरिकांचा समावेश होता. खुद्द नाणारसह कुंभवडे, विल्ये, सागवे, पडवे, साखर, उपळे, रामेश्वर, गिर्ये या प्रकल्पबाधित गावांतील ग्रामस्थांसह देवगड आणि कणकवली येथील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

मोर्च्याचे नेतृत्व विशिष्ट व्यक्तीने केलेले नसूनही अत्यंत शिस्तबद्ध रीतीने तो पार पडला. मोर्च्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराबाहेर थांबल्यावर निवडक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यास गेले असताना मोर्चेकरी घोषणा न देता शांतपणे आवाराबाहेर उभे राहिले. उत्स्फूर्तपणे आलेल्या माणसांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले, परंतु रॅपर रस्त्यावर फेकून कचरा होणार नाही तसेच चालतं वाहतुकीला अडथळा होऊ नये  याची काळजी घेतल्याने मोर्चाविषयी शहरवासीयांनीही कौतुकोद्गार काढले.





 









रिफायनरीला अनुकूल लोकमत वाढत आहे

'ग्रीन रिफायनरी परत आणणार'   
आज रत्नागिरीत निघणार मोर्चा
चार हजारांहून अधिकांचा सहभाग / आंदोलन सनदशीर मार्गनेच  
रिफायनरी परत आणण्याचीच असा निर्धार करून आंदोलन पुकारणाऱ्यांना जिल्ह्यातून वाढत प्रतिसाद मिळत आहे. जवळजवळ चार हजार लोकांचा भव्य मोर्चा उद्या शनिवारी रत्नागिरी शहरात निघत आहे. नाणार येथील रद्द झालेल्या परंतु अद्याप अन्य कोणतेही ठिकाण निश्चित न झालेल्या 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (आरआरपीसीएल) या अवाढव्य तेल शुद्धीकरण कारखान्याला  परत प्रस्तावित ठिकाणी आणण्यासाठी रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील विविध स्तरांवरील जनता एकवटली आहे. कोकण विकास समितीतर्फे हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणि जवळजवळ दीड लाख लोकांना रोजगारसंधी देण्याची क्षमता असलेला 'आरआरपीसीएल' हा प्रकल्प राजकीय पक्षांच्या हट्टामुळे रद्द करण्यात आला होता, परंतु शेतकरी जमीन देण्यास आणि प्रकल्पाचे स्वागत करण्यास तयार असतील त्या जिल्ह्याला तो प्रकल्प मिळेल, असे वक्तव्य त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देऊन स्थानिकांनी साडेसातहजार एकर जमिनी देण्याचे तयारी दाखविली आहे. सुरुवातीला दहशत आणि धमक्यांमुळे समर्थनासाठी पुढे येण्यास तयार न झालेले लोक आता संघटितपणे प्रकल्पाच्या मागणीसाठी सक्रिय झाले आहेत. नाणार पंचक्रोशीतील जमीनधारक आणि भूमिकन्यांच्या सहकारी संस्थांसह एक हजाराहून अधिक ग्रामस्थ उद्याच्या मोर्चात स्वेच्छेने सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेची भरभराट करू शकणाऱ्या या प्रकल्पाच्या समर्थनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरातील मारुतीमंदिर सर्कलपासून सुरू होणाऱ्या या मोर्चात रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तिन्ही तालुक्यांमधील व्यापारी संघटना, बांधकाम उद्योग संघटना, हॉटेल उद्योजक, वाहन सेवा व दुरुस्ती उद्योग आणि अन्य विविध व्यावसायिकांच्या संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. प्रकल्पाच्या अफाट रोजगार क्षमतेचा सकारात्मक विचार करून विविध विषयांचे शिक्षण व प्रशिक्षण घेणाऱ्या आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांचे पाठबळ 'कोकण विकास समिती'ला वाढत्या प्रमाणावर मिळत आहे. प्रकल्पाविषयी अकारण पसरविल्या गैरसमजुतींचे खंडन करून वस्तुस्थिती काय आहे याची जाणीव जिल्हावासियांना करून देण्यासाठी समितीचे कार्यकर्ते जिल्ह्याचा विशेषतः दक्षिण भाग पिंजून काढत आहेत. चला 'असत्याकडून सत्याकडे' अशी घोषणा देत पुकारलेले आमचे आंदोलन सकारात्मक असून पूर्णपणे सनदशीर मार्गाचाच अवलंब आम्ही करत आहोत असे समितीचे प्रवक्ते अविनाश महाजन आणि केशव भट यांनी सांगितले आहे. 












प्रकल्प विरोधकांनीही कसली कंबर 
  • ७ हजार एकर देण्यासाठी जमीन मालक तयार 
  • दीड लाखांना मिळू शकतो रोजगार 
  • 'जीएसटी'च्या रूपाने मिळणार ३८ हजार कोटी 
  • कोट्यवधींच्या 'सीएसआर'मधून सार्वजनिक हित शक्य   


राजकीय गरजेपोटी रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करून रायगड जिल्ह्यात पाठविलेला, परंतु रायगड जिल्ह्यानेही न स्वीकारलेला 'आरआरपीसीएल' हा तेलशुद्धीकरण कारखाना पुन्हा आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी रत्नागिरीकर एकवटले आहेत.  प्रामुख्याने या कारखान्याच्या प्रचंड रोजगार निर्मिती क्षमतेचा विचार करून कारखान्याच्या मूळ प्रस्तावाकडे जिल्हावासीयांनी सकारात्मकतेने पहिले पाहिजे याकडे वाढते लोकमत झुकू लागले आहे. परत गेलेला हा अवाढव्य प्रकल्प माघारी आणण्यास शासनाला अनुकूल बनविण्यासाठी शनिवार दिनांक २० जुलै रोजी समर्थकांतर्फे रत्नागिरी येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील चार पेट्रोलियम कंपन्या आणि 'आरामको' ही सौदी अरेबियन कंपनी यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.(आरआरपीसीएल)' चा तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या नैऋत्य भागात नाणार परिसराची निवड करण्यात आली. मात्र या प्रस्तावाला लोकांचा विरोध होऊ लागला. राज्य शासनात सहभागी असलेल्या शिवसेनेने प्रकल्प विरोधकांची बाजू उचलून धरली. राज्याचे उद्योगमंत्रीपद सांभाळणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी प्रकल्पाकरिता जमीन संपादित करण्याची अधिसूचनाही रद्द केली. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प होणारच असे जाहीर केले. मात्र लोकसभा निवडणूक तोंडाशी आल्यावर युती करण्याच्य निमित्ताने प्रकल्प रद्द करण्याचा आपला हेतू शिवसेनेने पूर्ण करून घेतला. 

त्यावेळी  'आरआरपीसीएल' रायगड जिल्ह्यात नेण्याची घोषणा करतानाच जो जिल्हा त्याचा स्वीकार करील त्याला तो देण्यात येईल असेही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. नेमका हाच धागा धरून कारखान्यासाठी स्थानिक जमीन मालकांनी सात हजार एकर जमीन देऊ केल्याचा दावा करत प्रकल्पाचे समर्थक 'नाणार येथेच रिफायनरी झाली पाहिजे' अशी मागणी करू लागले आहेत. कारखान्याची उभारणी होताना आणि उत्पादन सुरु झाल्यावर सुमारे दीड लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता असणारा हा प्रकल्प रद्द करून कोकणातील जनतेचे आणि युवा पिढीचे आर्थिक नुकसान केले जात आहे, प्रकल्पाला विरोध करण्यासाठी दिली जात असलेली करणे निराधार आणि ठरीव आहेत, असे प्रतिपादन करीत 'कोकण विकास समिती'च्या झेंड्याखाली एकत्र येऊन प्रकल्प समर्थक आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्रांकडे मांडण्यासाठी मोर्चा काढून शासनाला निवेदन देणार आहेत. 

प्रकल्पाची एकूण व्याप्ती आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था कित्येक पटींनी विस्तारण्याची क्षमता लक्षात घेऊन संपूर्ण जिल्ह्यातूनच प्रकल्पाला अनुकूल लोकमत तयार होत आहे. व्यापारी संघटना, उद्योजक, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा 'नाणार परत आणा' या मागणीला वाढत पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, समर्थकांची वाढती संख्या पाहून प्रकल्पाचे विरोधक पुन्हा सक्रिय झाले आहेत. 'कोकण भूमिकन्या महामंडळा'च्या पुढाकाराने त्यांनी समर्थकांना भिडण्याची तयारी करून पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी आंदोलन छेडले आहे. २० जुलै रोजीच विरोधच मोर्चा काढण्याचे त्यांनी घोषित केले, मात्र पोलिसांनी त्या तारखेची परवानगी नाकारत सनदशीर मार्गाने आंदोलन करा, भिडण्याची भाषा करता येणार नाही अशी तंबी प्रकल्प विरोधकांना दिली आहे.   

हा प्रकल्प प्रदूषणकारी आहे ही समजूत अज्ञानावर आधारित आहे, या प्रकल्पातून कोणतेही सांडपाणी अथवा घातक द्रव्ये बाहेर टाकली जाणार नाहीत, यात 'युरो ६' दर्जाचे इंधन तयार केले जाणार असून प्रदूषण नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार परिसराचे वातावरण प्रदूषणमुक्त ठेवणे बंधनकारक आहे, असे प्रकल्प समर्थक सांगत आहेत. या प्रकल्पात लाख दीड लाख लोकांना नोकऱ्या अथवा स्वयंरोजगार मिळणे एवढीच केवळ जमेची बाजू नाही तर प्रकल्पाच्या निमित्ताने चांगल्या शाळा महाविद्यालये, कौशल्य प्रशिक्षण संस्था, रुग्णालये, पाणी पुरवठा, उत्तम रस्ते यांसारख्या सुधारणा होतील. या भव्य प्रकल्पाच्या प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे थोडाथोडका नव्हे तर ३८ हजार कोटी रुपये 'जीएसटी' मिळणार आहे. राज्याला आणि राष्ट्राला कररूपाने एवढे मोठे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या प्रकल्पाच्या कोट्यवधी रुपयांच्या 'सीएसआर'मधून जिल्ह्यात सार्वजनिक हिताची अनेक लहानमोठी कामे होऊन रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचे चित्रच पालटून जाईल, या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन प्रकल्प नाणार येथेच उभारण्याचा कोकणवासीयांच्या हिताचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा असे आवाहन  प्रकल्प समर्थकांनी केले आहे.    

Saturday, July 13, 2019

‘रिफायनरी पाहिजे’ आंदोलनाला जिल्हाभरातून वाढता प्रतिसाद

                                                                                                      आणखी वाचा 




गैरसमजुती आणि पूर्वग्रहावर आधारित विरोध करून नुकसान करून घेण्यापेक्षा कारखान्याच्या रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करण्याच्या प्रचंड क्षमतेचा विचार करून तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या स्वागताची भूमिका घेणे इष्ट आहे. प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या या भूमिकेकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्याच्या हेतूने २० जुलै रोजी रत्नागिरीत प्रकल्प समर्थकांचा मोर्चा आयोजित केला आहे अशी माहिती 'कोकण विकास समिती'तर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आम्ही सर्वजण याच कोकणमातीची लेकरे आहोत, या भूमीच्या निसर्गसौन्दर्याचे आम्हालाही प्रेम आहे, परंतु सरसकट विरोध न करता सर्वांगीण प्रादेशिक विकासाची कास धरून आर्थिक नकाशावर कोकणाचे ठळक स्थान निर्माण करण्याचे महत्त्व ओळखले पाहिजे असे समितीचे प्रवक्ते अविनाश महाजन, केशव भट, ज्येष्ठ उद्योजक आणि भूतपूर्व पत्रकार टी. जी, तथा बाळासाहेब शेट्ये, तसेच राजीव कीर यांनी सांगितले. समितीचे निमंत्रक व उद्योजक कौस्तुभ सावंत यावेळी समितीतर्फे उपस्थित होते.
लोकांचा विरोध आहे असे भासवत राजकारण्यांनी जिल्ह्याबाहेर घालविलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीची मागणी करण्यासाठी शनिवार दिनांक २० जुलै रोजी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या दिवशी सकाळी अकरा वाजता मारुतीमंदिर सर्कलपासून मोर्चा सुरु होईल. कोकणच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाची उभारणी व्हावी असे मनापासून वाटणाऱ्यानी उत्स्फूर्तपणे येऊन मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. या कारखान्याची उभारणी होत असताना तेथील कामाला पूरक मनुष्यबळ स्थानिकांमधून तयार करण्यासाठी तसेच पूरक व आनुषंगिक उद्योग थाटण्यात स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी जिल्हावासीयांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समितीचे कार्यकर्ते शहरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, चार्टर्ड अकांउटंटस, विविध सामाजिक संस्था, विविध ज्ञातिसंस्था यांच्या भेटी घेत असून त्याना प्रकल्पाबद्दल पुरविण्यात आलेले गैरसमज आणि वस्तुस्थिती याबाबत माहिती देत आहेत.
हा प्रकल्प पर्यावरण, फलोत्पादन आणि मच्छीव्यवसायाला कसा हानिकारक नाही याबद्दल समितीतर्फे देण्यात येत असलेल्या वास्तव माहितीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘लाल प्रवर्गा’त (रेड कॅटेगरी) असणारे प्रकल्पही प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पर्यावरणपूरक पद्धतीने चालवता येतात. कृषि आणि फलोद्यानात अग्रेसर असलेल्या कॅलिफोर्नियासारख्या प्रांतात कोणतीही पर्यावरणीय हानी करता अठरा रिफायनरी सुरू आहेत. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प किती प्रगत आणि पर्यावरणपूरक आहे हे समितीचे कार्यकर्ते महाविद्यालयीन युवकांनाही सोदाहारण समजावून सांगत आहेत त्यांना याच जिल्ह्यात नोकरीधंद्याच्या किती संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे ते समजावून सांगत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जेव्हा सत्य समजून आपल्याला भविष्यात नोकरी, रोजगाराच्या आणि उद्योगधंद्यांच्या किती संधी मिळू शकतात हे लक्षात येते त्यावेळीही तरुणांई उत्स्फूर्तपणे प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत आहे. जैतापूर, देव, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, चिपळूण येथूनही समाजातील सर्व स्तरावर वाढता प्रतिसाद मिळत आहे.
क्रेडाई, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमी, हॉटेल असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, क्षत्रिय मराठा मंडळ, जाणीव फौंडेशन, जनजागृती संघ, आधार फाउंडेशन, व्यापारी संघटना, अभावानेच, अशा अनेक संघटना या आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी पक्षीय आणि राजकीय मतभेद तसेच व्यावसायिक स्पर्धा विसरून झटत आहेत.
उद्योगांकडे सकारात्मक आणि स्वागतशील दृष्टीने पाहण्याची जाणीव कोकणात मूळ धरू लागली आहे. अव्यवहारी विरोधात शक्ती खर्च करण्याऐवजी जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधने आणि त्यापासून करावयाची  उत्पादने यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यास जिल्हावासीयांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. 
तीन लाख कोटी रुपये एवढी प्रचंड गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये उभारणी सुरु झाल्यापासून उत्पादन सुरु होईपर्यंत सुमारे दीड  लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रकल्पामुळे परिसरात होणाऱ्या वाढीव वसाहतींना सर्व प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्याची गरज भासेल. त्यामुळे विविध वस्तूंचा व्यापार, सेवा उद्योग आणि कुशल व अकुशल व्यक्तींना रोजगार यांना भरपूर वाव मिळेल. अखंड पाणी पुरवठा, चांगल्या शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण संस्था तसेच मोठ्या रुग्णालयांची उभारणी होईल. या सर्व गोष्टींचा स्थानिकांना लाभ मिळणारच. हे ध्यानात घेऊन प्रकल्पाच्या मागणीला जोरदार पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी जिल्हाभरातून येऊन संघटितपणे आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.      
नाणार येथे उभारला जाणारा पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प हा पर्यावरणाला हानिकारक नाही. त्यातून सांडपाणी बाहेर टाकले जाण्याचे प्रमाण शून्य असेल. कारखान्याच्या परिसराभोवतालच्या हवामानाच्या दर्जाची सतत तपासणी करण्याची व्यवस्था सर्वत्र उभारली जाणार आहे. कारखान्याकडून प्रदूषण झालेच तर या जिल्ह्याचे रहिवासी म्हणून व्यवस्थापनाला जाब विचारण्याची मोकळीक भूमिपुत्र म्हणून आपल्याला असणारच आहे असेही समिती सदस्यांनी सांगितले.

Friday, July 5, 2019

‘रिफायनरी परत आणा’ समर्थक गरजणार

       २० जुलैला भव्य मोर्चा / प्रकल्पांच्या स्वागताची रुजतेय भावना

     पंचेचाळीस वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या 'अल्युमिना' प्रकल्पापासून एकूण एक मोठ्या कारखान्यांना कडाडून विरोध करण्याचा इतिहास असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेमध्ये सकारात्मक विचार रुजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी रद्द करण्यात आलेला नाणार येथील प्रस्तावित पेट्रोलियम प्रकल्प परत जिल्ह्यात आणण्यासाठी कोकणवासी एकवटले आहेत. एवढेच नव्हे तर या प्रकल्पाच्या उभारणीसाठी तब्बल सातहजार एकर जमिनी देऊ करत परिसरातील जमीन मालक पुढे आले आहेत.

 कोकणात येऊ पाहणाऱ्या कारखान्यांना आणि  प्रकल्पांना विरोध करण्याची अनेक आंदोलने कोकणवासीयांनी पाहिली, परंतु एखाद्या प्रकल्पाची उभारणी करा अशी मागणी करण्यासाठी या भूमिपुत्रांनी एखादी चळवळ केल्याचे रत्नागिरी जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासात सापडत नाही. मात्र तसा योग्य या महिन्याच्या २० तारखेला  आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला नाणारचा प्रस्तावित तेलशुद्धीकरण कारखाना (रिफायनरी) परत घेऊन येण्यासाठी प्रकल्प समर्थकांनी कंबर कसली आहे. प्रचंड रोजगार निर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प याच जिल्ह्यात उभारला जावा यासाठी रत्नागिरी शहरातील व्यापारी, हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक संघटित झाले असून प्रकल्पाच्या समर्थनासाठी संपूर्ण जिल्ह्यात लोकमत संघटित करण्याची पावले पडू लागली आहेत.

      रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी शुक्रवारी एक बैठक घेऊन प्रकल्प परत आणण्याच्या चळवळीचा कृती आराखडा आखला. त्यानुसार जुलैच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे २० तारखेला प्रकल्प समर्थकांचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे. त्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता माळनाक्यापासून या मोर्चाचा प्रारंभ होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो नेण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्प समर्थकांतर्फे निवेदन देण्यात येईल. या मोर्च्याच्या आयोजनाबरोबरच प्रस्तावित प्रकल्प परिसरातील जनतेला प्रकल्पाची शास्त्रोक्त माहिती देऊन त्यासंबंधीचे गैरसमज नाहीसे करणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील व्यावसायिक आणि आम जनतेचे समर्थन मिळविणे तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हावासीयांच्या भावना शासनासमोर मांडणे ही उद्दिष्ट्ये डोळ्यांपुढे ठेवून हा कृती आराखडा आखण्यात आला आहे.
             
     'कोकण जनकल्याण प्रतिष्ठान'चे सचिव अविनाश महाजन, निमंत्रक कौस्तुभ सावंत, आनंद जोशी  यांसह सर्वश्री महेंद्रशेठ जैन, उदय पेठे, दिनेश जैन, केशव भट, राजेश शेट्ये, राजेंद्रशेठ जैन, निलेश मलुष्टे, संतोष तावडे, प्रमोद खेडेकर, मनोज पाटणकर, दीपक साळवी,  राजीव लिमये, सुहास  ठाकूरदेसाई, राजेंद्रप्रसाद मसुरकर, अमोल लेले इत्यादी मान्यवर रत्नागिरीकर या सभेला उपस्थित होते. 'नाणार जाणार' या विचाराला दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली देण्याची कल्पना नंदू पटवर्धन यांनी मांडली. या प्रकल्पातून युरो-६ निकषांची पूर्तता करणारे इंधन तयार होणार असल्याने प्रदूषणमुक्त असेल ही वास्तव बाब नागरिकांना समजावून देण्याच्या उद्दिष्टावर भर देण्यात आला. त्यानंतर रत्नागिरी ग्रीन रिफायनरी याच नावाने या प्रकल्पाची सकारात्मक ओळख जनतेला करून देण्याचे ठरले.      

        हा प्रकल्प केवळ काही नोकऱ्या देण्यापुरतीच ‘रोजगार संधी’ आणणार नाही, तर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असल्याने या लोकसमुदायाच्या वेगवेगळ्या मानवी आणि नागरी गरजा पुरविणाऱ्या विविध प्रकारच्या व्यावसायिकांना सेवा आणि वस्तूंच्या माध्यमातून उत्पन्नवाढीची सुवर्णसंधी मिळणार आहे. प्रकल्पामुळे दर्जेदार शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, संशोधन प्रयोगशाळा, पाणीपुरवठा, रुंद रस्ते, आंबा, काजू, मासळीसारख्या स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ इत्यादी लाभ मिळतील. या कारखान्यात ‘युरो-६’ निकषांची पूर्तता करणाऱ्या इंधनाची निर्मिती होणार असल्याने तो प्रदूषणकारी आहे असे म्हणणे हे अज्ञानाचे लक्षण ठरेल. कोकणवासीयानी या प्रकल्पाविषयी मनात असलेले गैरसमज सोडावे आणि  राहणीमान उंचावण्याची आणि प्रादेशिक व आर्थिक विकासाची संधी हातची गमावली जाऊ नये यासाठी सकारात्मक भावनेने प्रकल्प समर्थनाची भूमिका घेऊन मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या सभेत करण्यात आले.
       
        'कोकण जनकल्याण प्रतिष्ठान'च्या माध्यमातून प्रकल्पाला अनुकूल असलेल्यांचे संघटन करण्याची प्रक्रिया प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय होण्याआधीच सुरु झाली होती. या प्रकल्पामुळे एक ते दीड लाख लोकांना रोजगार मिळेल तसेच राहणीमान उंचावून प्रादेशिक विकास साध्य होईल याची माहिती देण्यासाठी या संघटनेने एक सादरीकरणही रत्नागिरीत आयोजित केले होते. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि निवडणुकीतील मतपेटीवरील लक्ष यामुळे प्रकल्प रद्द करण्यात आला. त्याचवेळी ज्या जिल्ह्याला हवा असेल त्याला प्रकल्प देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी घोषित केले होते. याचाच धागा धरून आणि जमीनमालकांची संमती मिळवून 'रिफायनरी' परत आणण्याचे प्रयत्न जोमाने सुरु झाले आहेत. नाणार परिसरातील जवळजवळ ७ हजार एकर जमीन प्रकल्पासाठी देण्याकरिता जमीनमालक तयार झाले आहेत. या प्रकल्पाच्या अंगी असलेली प्रचंड रोजगार निर्मिती क्षमता विचारात घेऊन व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये प्रकल्पाच्या समर्थनाची भावना प्रबळ होत आहे.                                                                 

कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...