Wednesday, July 17, 2019

'नाणार पाहिजेच' मोर्चाला भरपूर प्रतिसाद

   व्यापाऱ्यांनी ठेवली दुकाने बंद
   
   पादचारी पुलावरून झाली पुष्पवृष्टी
   
   संपूर्ण बिगर राजकीय आंदोलन 
   

रिफायनरी झालीच पाहिजे अशी मागणी करत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलेल्या नाणार समर्थकांच्या मोर्च्याला जिल्ह्यातील विविध व्यावसायिक आणि जनसंघटनाचे भरपूर पाठबळ मिळाल्याचे पाहायला मिळाले. मोर्च्याला मिळालेला प्रतिसाद पाहून हाकालपट्टी होत असलेलै तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे स्वागत करणाऱ्यांची संख्याही दखल घेण्याएवढी मोठी असल्याचे सिद्ध झाले. विविध व्यावसायिक संघटनांबरोबरच कोणत्याही संस्था-संघटनेशी थेट संबंध नसलेल्या सामान्य शेतकऱ्यांची मोर्च्यातील उपस्थिती लक्षणीय होती. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा या मोर्च्याच्या आयोजन आणि नेतृत्वात काहीही संबंध नव्हता. जवळजवळ साडेतीन हजार नागरिक या मोर्च्यात सहभागी झाले होते.

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या मागणी मोर्चाचा प्रारंभ रत्नागिरी येथील मारुतीमंदिर या महत्त्वाच्या ठिकाणापासून झाला. मोर्च्याच्या अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला द्यावयाच्या निवेदनाचे जाहीर वाचन प्रवक्ते अविनाश महाजन यांनी केले. या निवेदनात प्रकल्पाच्या प्रस्तावांपासून आजवर घडलेला इतिहास थोडक्यात स्पष्ट करण्यात आला असून प्रकल्पाविषयीचे गैरसमज व त्यांचे खंडन, अशा प्रकल्पना असणारी कोकणभूमीची अनुकूलता आणि प्रकल्प रद्द करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार जमीन उपलब्ध करून देण्यास पुढे येणाऱ्यांची माहिती या बाबी तपशीलवार लिहलेल्या होत्या. प्रकल्प उभारणीपूर्वी झालेल्या जनसुनावणीत लोकांनी होकार दिल्यानंतर मुंबईस्थित पर्यावरणाच्या ठेकेदारांनी विरोधाची बीजे पेरण्यास कशी सुरुवात केली आणि विद्ववत्तेचा आव आणत प्रकल्पाच्या धोक्यांबाबत लिहिणारा प्रत्यक्षात खंडणीखोर कसा निघाला याची माहिती देण्यात आली आहे.

या मोर्च्याला रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील लोक स्वेच्छेने आले होते. त्यांमध्ये व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, औषध विक्रेते, कर सल्लागार, मच्छीमार, लघु उद्योग, सुवर्णकार, गॅरेज व्यावसायिक, प्लम्बर यांच्या संघटना तसेच काही ज्ञातिसंघटना, सेवाभावी संस्था आणि स्वतंत्रपणे आलेल्या नागरिकांचा समावेश होता. खुद्द नाणारसह कुंभवडे, विल्ये, सागवे, पडवे, साखर, उपळे, रामेश्वर, गिर्ये या प्रकल्पबाधित गावांतील ग्रामस्थांसह देवगड आणि कणकवली येथील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

मोर्च्याचे नेतृत्व विशिष्ट व्यक्तीने केलेले नसूनही अत्यंत शिस्तबद्ध रीतीने तो पार पडला. मोर्च्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराबाहेर थांबल्यावर निवडक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यास गेले असताना मोर्चेकरी घोषणा न देता शांतपणे आवाराबाहेर उभे राहिले. उत्स्फूर्तपणे आलेल्या माणसांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले, परंतु रॅपर रस्त्यावर फेकून कचरा होणार नाही तसेच चालतं वाहतुकीला अडथळा होऊ नये  याची काळजी घेतल्याने मोर्चाविषयी शहरवासीयांनीही कौतुकोद्गार काढले.





 









No comments:

Post a Comment

कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...