विशेष घटना

 बाबा सावलीसारखे पाठीशी असतात 

डॉ. चंद्रशेखर सखाराम मसुरकर (वैद्यकीय व्यावसायिक, मंडणगड ९४२११३५५०६)

मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर बाबांचा आधार मला खांबासारखा होता. त्यांच्या सान्निध्यात मी सुमारे दहा वर्षे होतो. त्यांचे आचारविचार, शिवाय नाटकाची, नाट्यगीतांची आवड आत्मसात करणे हे मला त्यांच्यामुळेच शक्य झाले. मी प्रॅक्टिस करू लागल्यावर त्यांनी मला बजाज स्कूटर  घेऊन दिली. त्या काळात बजाज गाडीला नंबर लागायचे. कुटुंबात ते माझे वडील तर दवाखान्यात माझे गुरु होते. मंडणगड सारख्या लहानशा गावात त्यांनी मला  इंटर्नशिपसारखे प्रशिक्षण दिले. पेशंटला काय होते हे न विचारता अचूक निदान करण्याचे त्यांचे कौशल्य मला  वर दिल्यासारखे दिले.    

त्यांनी मला स्वतःचा वैद्यकीय वारसा तर दिलाच, पण मानवतेची अमूल्य शिकवण दिली आणि निर्भय बनविले.
त्यावेळी वैद्यकीय व्यावसायिक दोनच - बाबा आणि सरकारी डॉक्टर परकार. एक प्रसंग सांगतो. एकदा आम्ही व्हिजिटला देव्हाऱ्याजवळच्या नायणे गावी गेलो होतो.  येताना भयंकर पाऊस. विजेचा लोळ जणू आपल्याच दिशेने येतोय असा भास होत होता. मी तर पूर्णतः घाबरूनच गेलो. पण पितृरूप भिंत माझ्यामागे उभी होती. मला धीर दिला, "अरे चल, रामराम !" ते नेहमी रामराम म्हणत. तर ते मागे रामनाम घेत होते व मी स्कूटर चालवीत होतो.  पण त्यांच्या धाडसामुळे मंडणगड केव्हा आले हे कळले नाही. असे अनेक प्रसंग मी त्यांच्यासोबत पहिले. 

आमचे बाबा धीट तर होतेच, पण सर्वगुणसंपन्न होते. कुठल्याही बाबतीत कधी कमी पडत नव्हते. ज्योतिषशास्त्र म्हणा, नाट्यगीतगायन म्हणा, ते रागदारी गट. सर्व रागांची, सप्तसुरांची त्यांना चांगली जाण होती. त्यांची मी कुणाशीही तरुण करू शकत नाही. अशी व्यक्ती 'न भूतो, न भविष्यति !' जेव्हा एखादी गुंतागुंतीची केस येते तेव्हा ते माझ्या पाठीशी सावलीसारखे उभे आहेत असे वाटते. त्यांचे स्मरण केल्यावर मी त्या पेशंटवर उपचार करण्यात यशस्वी होतो. 

त्यांनी हाताळलेला स्टेथास्कोप अजूनही माझ्याकडे आहे. काही लोक तो जुना झाला असे म्हणतात, पण मी तो जपून ठेवला आहे. त्या स्टेथास्कोपने त्यांनी अनेक रुग्ण तपासले असतील. त्यांची कात्री, जीभ तपासण्याचा पॅच्युला, ही उपकरणे मी अजून जपून ठेवली आहेत. ते दात काढत त्या पकडी आठवण म्हणून ठेवल्या. तेव्हा खेडेगावात स्वतंत्र दंतरोगचिकित्सक नव्हते. आता आम्ही दात काढणे नियमांत बसत नाही. त्यांनी परोपकारी बुद्धीने केलेले ' रोगपीडित सेवे'चे कार्य जमेल तेवढे पुढे चालविण्याचा वारसा मला मिळाला आहे आणि बाबा माझ्याकडून चांगले काम करून घेत आहेत.          



     


आर्थिक नकाशावर कोकणाचे ठळक स्थान निर्माण करू या !

        गैरसमजुती आणि पूर्वग्रहावर आधारित विरोध करून नुकसान करून घेण्यापेक्षा कारखान्याच्या रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करण्याच्या प्रचंड क्षमतेचा विचार करून तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या स्वागताची भूमिका घेणे इष्ट आहे. प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या या भूमिकेकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्याच्या हेतूने २० जुलै रोजी रत्नागिरीत प्रकल्प समर्थकांचा मोर्चा आयोजित केला आहे अशी माहिती 'कोकण विकास समिती'तर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आम्ही सर्वजण याच कोकणमातीची लेकरे आहोत, या भूमीच्या निसर्गसौन्दर्याचे आम्हालाही प्रेम आहे, परंतु सरसकट विरोध न करता सर्वांगीण प्रादेशिक विकासाची कास धरून आर्थिक नकाशावर कोकणाचे ठळक स्थान निर्माण करण्याचे महत्त्व ओळखले पाहिजे असे या समितेतर्फे सांगण्यात आले.
      लोकांचा विरोध आहे असे भासवत राजकारण्यांनी जिल्ह्याबाहेर घालविलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीची मागणी करण्यासाठी शनिवार दिनांक २० जुलै रोजी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या दिवशी सकाळी अकरा वाजता माळनाक्याजवळील मराठा मैदानापासून मोर्चा सुरु होईल. कोकणच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाची उभारणी व्हावी असे मनापासून वाटणाऱ्यानी उत्स्फूर्तपणे येऊन मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. या कारखान्याची उभारणी होत असताना तेथील कामाला पूरक मनुष्यबळ स्थानिकांमधून तयार करण्यासाठी तसेच पूरक व अनुषंगिक उद्योग थाटण्यात स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी जिल्हावासीयांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. 
          उद्योगांकडे सकारात्मक आणि स्वागतशील दृष्टीने पाहण्याची जाणीव कोकणात मूळ धरू लागली आहे. अव्यवहारी विरोधात शक्ती खर्च करण्याऐवजी जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधने आणि त्यापासून करावयाची  उत्पादने यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यास जिल्हावासीयांनी पुढे यावे असे आवाहनही करण्यात आले. 
       'कोकण जनकल्याण प्रतिष्ठान'चे सचिव अविनाश महाजन आणि हॉटेल व पर्यटन सेवा व्यावसायिक कौस्तुभ सावंत या निमंत्रकांसह महेंद्र  जैन, महेंद्र गुंदेचा, महेश गर्दे, मनोज पाटणकर, निलेश मलुष्टे, नित्यानंद भुते, प्रमोद खेडेकर, प्रवीण लाड, राजीव लिमये, आनंद जोशी, रुची महाजनी, आसावरी शेट्ये, बशिर मुर्तुझा, बिपिन शहा, राजेंद्रप्रसाद मसुरकर, राजेश शेट्ये, राजेश महागावकर, सचिन शिंदे, साईजीत शिवलकर, टी.जी.शेट्ये, उदय पेठे इत्यादींचा समिती संघटित करणाऱ्यांत समावेश आहे. 
       तीन लाख कोटी रुपये एवढी प्रचंड गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये उभारणी सुरु झाल्यापासून उत्पादन सुरु होईपर्यंत सुमारे दीड  लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रकल्पामुळे परिसरात होणाऱ्या वाढीव वसाहतींना सर्व प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्याची गरज भासेल. त्यामुळे विविध वस्तूंचा व्यापार, सेवा उद्योग आणि कुशल व अकुशल व्यक्तींना रोजगार यांना भरपूर वाव मिळेल. अखंड पाणी पुरवठा, चांगल्या शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण संस्था तसेच मोठ्या रुग्णालयांची उभारणी होईल. या सर्व गोष्टींचा स्थानिकांना लाभ मिळणारच. हे ध्यानात घेऊन प्रकल्पाच्या मागणीला जोरदार पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी जिल्हाभरातून येऊन संघटितपणे आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.      

       नाणार येथे उभारला जाणारा पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प हा पर्यावरणाला हानिकारक नाही. त्यातून सांडपाणी बाहेर टाकले जाण्याचे प्रमाण शून्य असेल. कारखान्याच्या परिसराभोवतालच्या हवामानाच्या दर्जाची सतत तपासणी करण्याची व्यवस्था सर्वत्र उभारली जाणार आहे. कारखान्याकडून प्रदूषण झाले तर या जिल्ह्याचे रहिवासी म्हणून व्यवस्थापनाला जाब विचारण्याची मोकळीक आपल्याला असणारच आहे असेही समिती सदस्यांनी सांगितले. 

धीरज वाटेकर यांना लो.टिळक स्मारक’ग्रंथालयाचा 

'द. पा. साने वकील ग्रंथमित्रपुरस्कार जाहीर

चिपळूण : येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने ग्रंथालय चळवळीत सक्रीय असलेल्या आणि समाजात ग्रंथप्रेम वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'द. पा. साने वकील ग्रंथमित्रपुरस्कार लेखक, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांना जाहीर झाला आहे. धीरज वाटेकर यांच्यासारख्या ग्रंथमित्राचा पुरस्काराने सन्मान होतोय ही वाचनालयासाठी गौरवाची संधी असल्याची भावना ग्रंथालयाचे अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले यांनी व्यक्त केली. 
सन १९९७ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ माध्यमातून लिखाणाची, सामाजिक कार्याची गोडी लागलेल्या वाटेकर यांनी दैनिक कोकण गर्जना,पुढारीलोकसत्ता करिता पत्रकारिता केली आहे. अध्ययनासाठी केलेल्या हिमाचल ते कन्याकुमारी आणि भूतान या प्रवासातून जमविलेला किमान २५ हजार वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल फोटोंचा संग्रह त्यांच्याकडे आहे. गेल्या किमान तीसहून अधिक संग्राह्य विशेषांकस्मरणिकागौरव अंक, दिवाळी अंकांचे संपादन, संदर्भ कात्रणसंग्रहसंशोधन ग्रंथालय, "परमचिंतन" अभ्यासिकेसह संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन त्यांनी केले आहे. राज्यभरातील नियतकालिकतून विविध विषयांवरीलदीड हजारहून हून अधिक लेख प्रसिद्ध झालेत. कोकणच्या इतिहासाचे अभ्यासक अण्णा शिरगावकर यांनी लिहिलेल्या वाशिष्ठीच्या तीरावरून, गेट वे ऑफ दाभोळ, शेवचिवडा, व्रतस्थ, वाटचाल या ग्रंथांची निर्मिती आणि संपादन त्यांनी केले आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे यांचा सहवास लाभलेल्या सौ. कमल श्रीकांत भावे यांचे ‘कृतार्थीनी’ हे चरित्र त्यांनी लिहून प्रकाशित केले आहे. यात त्यांनी अण्णांच्या कार्याचाही गौरव केला आहे. त्यांची चिपळूण तालुका पर्यटनश्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी)श्रीक्षेत्र अवधूतवनठोसेघर पर्यटन, ही ५ पर्यटन पुस्तके आणि ग्रामसेवक ते समाजसेवकप्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी ह्या जीवनकथा प्रसिद्ध आहेत. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राने २००४ साली उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविले होते. २०१५ साली त्यांच्या ठोसेघर पर्यटन पुस्तकास कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा नलगे ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. सप्टेंबर २०१६ ला माय अर्थ फौंडेशनतर्फे पर्यावरण भूषण” पुरस्कारनोव्हेंबर २०१६ ला ज्येष्ठ समाजसेवकपद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात गौरवसंयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डॉ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पॉलिसी सेंटरया स्वयंसेवी संस्थेकडून गेल्यावर्षी जून महिन्यात 'प्रकाशाचे बेटहा पुरस्कार देऊनत्यांना सन्मानित करण्यात आले होते‘वाशिष्ठी नदी : उगम ते संगम’ हा संशोधित निसर्ग पर्यटन उपक्रम राबविण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे.
धीरज वाटेकर हे ग्रंथनिर्मितीसह पर्यावरण रक्षण, पर्यटन, कोकण विकास आदि सामाजिक चळवळीत अग्रभागी असतात. ते लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सर्व कामात अत्यंत तळमळीने सहकार्य करतात. त्यांचे लेखनही अत्यंत प्रवाही व वाचनीय असते. या निवडीबद्दल लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे आणि सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

रिलायन्स फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबिर

दिनांक २६/०६/२०१९ रोजी रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी व रिलायन्स पेट्रोल पंप यांच्या संयुक्त विद्यमाने हातखंबा येथील रिलायन्स पेट्रोल पंपमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयमार्फत ट्रक चालक, वाहक व शेतकऱ्यांसाठी   आरोग्य तपासणी , रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, व औषध पुरवठा करण्यात आला. या वेळेस ट्रक चालक, वाहक यांच्यासाठी एच आय वी /एड्स  बद्दल जनजागृती करण्यात आली, व त्यांची कर्करोगाबद्दल प्राथमिक परीक्षण व तंबाखू बंदी साठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . उत्तमराव कांबळे , स्टाफ नर्स प्राजक्ता जक्कर, समुपदेशक प्राची जाधव,समुपदेशक रामेश्वर मेत्रे, आयसीटीसी समुपदेशक  सतीश कांबळे,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ शीतल पोवार  यांनी रुग्णाची तपासणी व मार्गदर्शन केले . जिल्हा शल्य चिकित्सक माननीय श्री अशोक   बोल्डे सर यांचे शिबिरासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रिलायन्स पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक श्री रविराज बने यांनी कार्यक्रमाचे व्यव्यस्थापन व मार्गदर्शन केले . यावेळेस रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक  श्री राजेश कांबळे व कार्यक्रम सहाय्यक विनोद गवाणकर , फोटोग्राफर श्री सचिन शिंदे उपस्थित होते

समारंभात  बोलताना कुलगुरु डॉ देवानंद शिंदे, उपस्थितांत डावीकडून मंजिरी साळवी, डॉ श्रीरंग कद्रेकर, प्रमुख पाहुणे संजय ससाणे, जयु भाटकर व संजय सुर्वे (छाया - मकरंद पटवर्धन)

अवेश्री प्रकाशनाच्या 'कमलकुंज'चे 

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते अनावरण 

मसुरकर यांच्यातर्फे नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'अवेश्री प्रकाशना'च्या पहिल्या पुस्तकाचे अनावरण कोकण मराठी  परिषदेचे संस्थापक व प्रमुख विश्वस्त पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी येथील 'लक्ष्मी विष्णू' सभागृहात पार पडलेल्या या छोटेखानी पण शानदार सोहळ्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे  माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, कोमसापचे विश्वस्त अरुण नेरुरकर व अध्यक्ष महेश केळुस्कर, मुंबई दूरदर्शनचे सहाय्यक संचालक जयु भाटकर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित,  जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, दैनिक रत्नागिरी एक्स्प्रेसच्या प्रकाशिका नमिता कीर, सारस्वत मित्र मासिकाचे व्यवस्थापक मोहन कबीर, ओरिएंटल विमा कंपनीचे शाखा व्यवस्थापक विनय परांजपे, मरिनर दिलीप भाटकर, अवेश्री प्रकाशनाचे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, प्रा. मकरंद साखळकर इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले होते.

'कमलकुंज'  नावाचे हे पुस्तक सेवानिवृत्त शिक्षिका कमल बावडेकर यांच्या लेखणीतून अवतरले आहे. त्यांनी लिहिलेल्या कथा आणि साहित्यविषयक, प्रासंगिक व आत्मकथनपर लेखांचे तसेच श्रीमती बावडेकर यांच्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी लिहिलेल्या लेखनाचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील बिपीन लटोरे यांच्या 'प्रिंट होम'मध्ये पुस्तकाची छपाई करण्यात आली आहे. मुखपृष्ठ मंगेश मोरे यांनी तर अक्षरजुळणी समीर शिगवण यांनी केली आहे.

प्रकाशन सोहळयाचे आयोजन व संयोजन करण्यासाठी मनीषा, नारायण व केयूर रेगे, राजश्री, उदित व नारायण कामत यानी विशेष परिश्रम केले. सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी व आभार प्रदर्शन मिलिंद साखळकर व यांनी केले.

या समारंभाचा 'दैनिक तरुण भारत 'मध्ये प्रसिद्ध झालेला वृत्तांत पुढे देत आहोत.

3 comments:

  1. दै. सकाळ रत्नागिरी टुडे पान ३ वरही या पुस्तक प्रकाशनाची माेठी बातमी प्रसिद्ध झाली अाहे. तीसुद्धा येथे प्रसिद्ध करावी. धन्यवाद
    - मकरंद पटवर्धन
    रत्नागिरी

    ReplyDelete
    Replies
    1. श्री. मसुरकर सर धन्यवा
      सकाळची बातमी अपलाेड केल्याबद्दल
      खूप खूप अाभारी अाहे.

      Delete
  2. आपल्या ब्लॉगवर बातमी प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर। धीरज वाटेकर।

    ReplyDelete

कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...