Tuesday, October 16, 2018



कवयित्री भामिनीसखा यांचे निधन 

मंडणगड येथील डॉ एस एस मसुरकर मेमोरियल ट्रस्टच्या प्रवर्तक आणि कवयित्री भामिनी सखाराम मसुरकर यांचे रविवार दिनांक १४ ऑक्टोबर २०१८ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. भामिनीसखा या नावाने त्या कविता व मुलांसाठी गोष्टी लिहीत. 'कुसुमांजली' या नावाने त्यांच्या काही कविता २०१५ मध्ये प्रकाशित झाल्या होत्या. प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनातून बचत करून त्यांनी आपले दिवंगत परोपकारी पती डॉ सखाराम सावळाराम मसुरकर यांच्या स्मरणार्थ ट्रस्ट स्थापन केला होता. त्या माध्यमातून मंडणगड व रत्नागिरी येथे समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. www.drmasurkartrust.webs,com


भामिनी मसुरकर या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातून प्राथमिक शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीची संख्या या विषयावरील त्यांच्या शोधनिबंधाला एनसीईआरटी या संस्थेकडून पारितोषिक मिळाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी कविता रचण्यास प्रारंभ केला. ईशस्तुती, शालेय कार्यक्रम, थोर व्यक्तींचे जीवन दर्शन, निसर्ग वर्णन इत्यादी विषयांवरील त्यांच्या कविता गेय आणि वृत्तात रचलेल्या असत. त्यांच्या अनेक कविता व बालकथा दैनिके व मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत.  'कुसुमांजली' या नावाने त्यांच्या कवितासंग्रहाचा पहिला भाग कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे माजी अध्यक्ष डॉ दिलीप पाखरे  यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाला होता.

मंडणगड येथील डॉ चंद्रशेखर मसुरकर, 'मोटार जगत'चे संपादक व ज्येष्ठ स्तंभलेखक राजेंद्रप्रसाद, सुरक्षा अधिकारी मिलिंद, पोलीस अधिकारी शुभेंद्रप्रसाद  हे पुत्र ज्येष्ठ परिचारिका सौ विद्या, आशा, मुग्धा आणि सुदर्शन या स्नुषा तसेच निर्मला (प्रतीक्षा ) अरुण कुबल,  भारती आणि सौ. उज्ज्वला पराडकर या कन्या व जामात आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.




कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...