Saturday, July 13, 2019

‘रिफायनरी पाहिजे’ आंदोलनाला जिल्हाभरातून वाढता प्रतिसाद

                                                                                                      आणखी वाचा 




गैरसमजुती आणि पूर्वग्रहावर आधारित विरोध करून नुकसान करून घेण्यापेक्षा कारखान्याच्या रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करण्याच्या प्रचंड क्षमतेचा विचार करून तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या स्वागताची भूमिका घेणे इष्ट आहे. प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या या भूमिकेकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्याच्या हेतूने २० जुलै रोजी रत्नागिरीत प्रकल्प समर्थकांचा मोर्चा आयोजित केला आहे अशी माहिती 'कोकण विकास समिती'तर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आम्ही सर्वजण याच कोकणमातीची लेकरे आहोत, या भूमीच्या निसर्गसौन्दर्याचे आम्हालाही प्रेम आहे, परंतु सरसकट विरोध न करता सर्वांगीण प्रादेशिक विकासाची कास धरून आर्थिक नकाशावर कोकणाचे ठळक स्थान निर्माण करण्याचे महत्त्व ओळखले पाहिजे असे समितीचे प्रवक्ते अविनाश महाजन, केशव भट, ज्येष्ठ उद्योजक आणि भूतपूर्व पत्रकार टी. जी, तथा बाळासाहेब शेट्ये, तसेच राजीव कीर यांनी सांगितले. समितीचे निमंत्रक व उद्योजक कौस्तुभ सावंत यावेळी समितीतर्फे उपस्थित होते.
लोकांचा विरोध आहे असे भासवत राजकारण्यांनी जिल्ह्याबाहेर घालविलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीची मागणी करण्यासाठी शनिवार दिनांक २० जुलै रोजी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या दिवशी सकाळी अकरा वाजता मारुतीमंदिर सर्कलपासून मोर्चा सुरु होईल. कोकणच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाची उभारणी व्हावी असे मनापासून वाटणाऱ्यानी उत्स्फूर्तपणे येऊन मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. या कारखान्याची उभारणी होत असताना तेथील कामाला पूरक मनुष्यबळ स्थानिकांमधून तयार करण्यासाठी तसेच पूरक व आनुषंगिक उद्योग थाटण्यात स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी जिल्हावासीयांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समितीचे कार्यकर्ते शहरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, चार्टर्ड अकांउटंटस, विविध सामाजिक संस्था, विविध ज्ञातिसंस्था यांच्या भेटी घेत असून त्याना प्रकल्पाबद्दल पुरविण्यात आलेले गैरसमज आणि वस्तुस्थिती याबाबत माहिती देत आहेत.
हा प्रकल्प पर्यावरण, फलोत्पादन आणि मच्छीव्यवसायाला कसा हानिकारक नाही याबद्दल समितीतर्फे देण्यात येत असलेल्या वास्तव माहितीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘लाल प्रवर्गा’त (रेड कॅटेगरी) असणारे प्रकल्पही प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पर्यावरणपूरक पद्धतीने चालवता येतात. कृषि आणि फलोद्यानात अग्रेसर असलेल्या कॅलिफोर्नियासारख्या प्रांतात कोणतीही पर्यावरणीय हानी करता अठरा रिफायनरी सुरू आहेत. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प किती प्रगत आणि पर्यावरणपूरक आहे हे समितीचे कार्यकर्ते महाविद्यालयीन युवकांनाही सोदाहारण समजावून सांगत आहेत त्यांना याच जिल्ह्यात नोकरीधंद्याच्या किती संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे ते समजावून सांगत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जेव्हा सत्य समजून आपल्याला भविष्यात नोकरी, रोजगाराच्या आणि उद्योगधंद्यांच्या किती संधी मिळू शकतात हे लक्षात येते त्यावेळीही तरुणांई उत्स्फूर्तपणे प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत आहे. जैतापूर, देव, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, चिपळूण येथूनही समाजातील सर्व स्तरावर वाढता प्रतिसाद मिळत आहे.
क्रेडाई, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमी, हॉटेल असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, क्षत्रिय मराठा मंडळ, जाणीव फौंडेशन, जनजागृती संघ, आधार फाउंडेशन, व्यापारी संघटना, अभावानेच, अशा अनेक संघटना या आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी पक्षीय आणि राजकीय मतभेद तसेच व्यावसायिक स्पर्धा विसरून झटत आहेत.
उद्योगांकडे सकारात्मक आणि स्वागतशील दृष्टीने पाहण्याची जाणीव कोकणात मूळ धरू लागली आहे. अव्यवहारी विरोधात शक्ती खर्च करण्याऐवजी जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधने आणि त्यापासून करावयाची  उत्पादने यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यास जिल्हावासीयांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. 
तीन लाख कोटी रुपये एवढी प्रचंड गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये उभारणी सुरु झाल्यापासून उत्पादन सुरु होईपर्यंत सुमारे दीड  लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रकल्पामुळे परिसरात होणाऱ्या वाढीव वसाहतींना सर्व प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्याची गरज भासेल. त्यामुळे विविध वस्तूंचा व्यापार, सेवा उद्योग आणि कुशल व अकुशल व्यक्तींना रोजगार यांना भरपूर वाव मिळेल. अखंड पाणी पुरवठा, चांगल्या शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण संस्था तसेच मोठ्या रुग्णालयांची उभारणी होईल. या सर्व गोष्टींचा स्थानिकांना लाभ मिळणारच. हे ध्यानात घेऊन प्रकल्पाच्या मागणीला जोरदार पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी जिल्हाभरातून येऊन संघटितपणे आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.      
नाणार येथे उभारला जाणारा पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प हा पर्यावरणाला हानिकारक नाही. त्यातून सांडपाणी बाहेर टाकले जाण्याचे प्रमाण शून्य असेल. कारखान्याच्या परिसराभोवतालच्या हवामानाच्या दर्जाची सतत तपासणी करण्याची व्यवस्था सर्वत्र उभारली जाणार आहे. कारखान्याकडून प्रदूषण झालेच तर या जिल्ह्याचे रहिवासी म्हणून व्यवस्थापनाला जाब विचारण्याची मोकळीक भूमिपुत्र म्हणून आपल्याला असणारच आहे असेही समिती सदस्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...