Sunday, July 21, 2019


जाहीर आभार

कोकणच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा पालटून टाकणाऱ्या रिफायनरीला परत आणण्यासाठी कधी नव्हे एवढ्या उत्साहाने कोकणवासी रत्नागिरीत एकत्र येऊन भव्य मोर्चामध्ये सहभागी झाले. कोकणातील जनतेची प्रकल्पविरोधी अशी प्रतिमा या सकारात्मक आंदोलनाने पुसून टाकली आहे आणि चांगल्या संधी घेऊन येणाऱ्या प्रकल्पांचे येथील जनता स्वागतच करते हा संदेश सर्वत्र पोहोचविला आहे. कोणीतरी उभ्या केलेल्या निराधार भीतीला बळी न पडण्याचा निर्धारही या मोर्चाद्वारे व्यक्त झाला आहे आणि व्यापक हिताचे मुद्दे घेऊन येणाऱ्यांना जनतेने भरभरून साथ दिली आहे,  'कोकण विकास समिती'तर्फे समस्त कोकणवासीयांची आभार मानण्यात येत आहेत. प्रकल्प समर्थनार्थ शनिवारी आयोजित केलेल्या मोर्चाला आलेल्या यशामुळे हजारो तरुण हातांना रोजगाराची संधी देणारा हा प्रकल्प त्याच ठिकाणी उभारण्याबाबत शासनाकडूनही सकारात्मक पावले उचलली जातील असा विश्वासही समितीने व्यक्त केला आहे. 

कोकण विकास समितीतर्फे मागील १५/२०  दिवस  ग्रीन रिफायनरीच्या पुनर्स्थापनेसाठी विविध सामाजिक संस्थांच्या मार्फत समाज प्रबोधन करण्यात आले.याचे फलित म्हणून दि. २० जुलै रोजी काढण्यात आलेल्या   बिगर राजकीय विराट मागणी मोर्चा मध्ये सहभागी होऊन सर्व कोकणी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोर्चाच्या कालावधीत उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेऊन समस्त व्यापारी बांधवांनी, बांधकाम व्यावसायिकांनी, रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवगड येथील शहरी आणि ग्रामीण जनतेने तसेच विविध सामाजिक संस्थांनी आणि ज्ञाती संघटनांनी आपला सहभाग नोंदवला. कामानिमित्त मुंबईत राहत असलेले अनेक लोक खास या मोर्चात सहभागी होण्यासाठी रत्नागिरीत आले. प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्राखालील शेतकऱ्यांनी सर्व दबाव झिडकारून  हजारोंच्या संख्येने हजेरी लावली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागही लक्षणीय ठरला. आपल्या अभूतपूर्व सहभागाने रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच विरोधासाठी नाही तर काही मागण्यासाठी निघालेला हा अभूतपूर्व प्रचंड मोर्चा यशस्वी केला त्याबद्दल  सर्वांचे मनःपूर्वक आभार आम्ही मानत आहोत.  

प्रकल्पाच्या पुनर्स्थापनेसाठी सुरु केलेले हे आंदोलन पूर्णतः सनदशीर मार्गाने पार पडायचे आहे. कोणताही आक्रमकपणा न दाखवता आपले म्हणणे मोठ्या पाठबळासह मांडता येते हेही जनतेने या मोर्च्यात स्वयंशिस्त आणि स्वच्छता पाळून सिद्ध केले. रत्नागिरी शहरातील माळनाका  येथील पादचारी पुलावरून काही रत्नकन्यांनी आंदोलकांवर पुष्पवृष्टी केली, यावरून सामान्य जनतेमध्ये किती मोठ्या प्रमाणावर सकारात्मक जाणीव रुजली आहे ते दिसून येते. ही सकारात्मक भावना आता कोकणवासीयांमध्ये वाढीस लागेल असा विश्वास आम्हाला वाटतो. जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने या सनदशीर प्रयत्नांची योग्य दखल घेऊन संपूर्ण सहकार्य दिले तसेच सर्व प्रसार माध्यमांनी अतिशय उत्तम प्रसिद्धी दिल्याबद्दलही  आम्ही त्यांचे आणि समस्त नागरिकांचे जाहीर आभार मानत आहोत.  

सर्व कार्यकर्ते,

कोकण विकास समिती

No comments:

Post a Comment

कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...