प्रचारासाठी सर्वत्र फिरताना दिसलेले उमेदवार निवडणुकीत विजय मिळाला नाही तर मात्र दिसेनासे होतात. विजयी उमेदवारांच्या मिरवणूक निघतात नि पराभूत उमेदवार जनतेसमोर येण्यास पुष्कळ आठवडे लोटतात. परंतु नियमाला अपवाद असतो त्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविले समाजवादी फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार अड. संजय गांगनाईक यांनी निकालानंतरच्या दीड महिन्याच्या काळात आपल्या मतदारसंघाचे दोन दौरे करून जनतेच्या आणखी काही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मूळचे कणकवलीचे सुपुत्र असणारे पनवेलनिवासी ऍड. गांगनाईक महामुंबईतील लोकल प्रवाश्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षे काम करत आहेत. कोकण दौऱ्यातही आपल्या सार्वजनिक कार्यात कोकण रेल्वे प्रवाश्यांच्या अडचणी समजून घेण्यास प्राधान्य देत त्यांनी कोकणवासियांच्या अन्य क्षेत्रांतील प्रश्नांचाही नव्याने अभ्यास सुरु केला आहे. केंद्रीय पातळीवरून भरघोस आर्थिक तरतूद होण्याकरिता कोकण रेल्वेचे लवकरात लवकर भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी केली.जितक्या जलद गतीने बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे तितक्याच तातडीने कोकण रेल्वेच्या मडगावपर्यंतच्या मार्गाचे दुपदरीकरण झाले पाहिजे अशीही मागणी श्री गांगनाईक यांनी केली.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५५ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. थोडी काळजी घेतली असती तर यातली अनेक झाडे वाचविता आली असती असे सांगून तोडल्याचा पाचपट झाडे लावून कोकणाचे निसर्गसौन्दर्य आणि पर्यावरण यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी त्यांनी केली. चौपदरीकरण अत्यंत संथ गतीने होत असून अनेक ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग खराब आहे, काँक्रीटीकरण व्यवस्थित झाली नाही आणि भरावयाची माती रस्त्यावर येऊन वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक एटीएम केंद्रांमध्ये पैसे उपलब्ध नसतात, नेटवर्कअभावी रोकडविरहित व्यवहार करता येत नाही, परिणामी जनतेची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी ग्राहकाला झालेल्या त्रासाबद्दल बँकांना दंड आकारला गेला पाहिजे असे मत त्यांनी प्रकट केले.
जैतापूरजवळ सागरी महामार्गाला जोडणाऱ्या दांडे अणसुरे पुलाची तातडीने दुरुस्ती करून अवजड वाहने व एसटी वाहतूक सुरु करावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी टाळंबा (कुडाळ) आणि शिरशिंगे (सावंतवाडी) या धरणांची कामे तातडीने मार्गी लावावी अशी मागणी या वार्तालापाद्वारे श्री. गांगनाईक यांनी केली.
No comments:
Post a Comment