Wednesday, November 21, 2018

सुंदर मी होणार


सुंदर मी होणार’ हे पु. . देशपांडे यांनी लिहिलेलं, गाजलेलं नाटक. ५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतल्या प्राथमिक फेरीच्या चौथ्या दिवशी (२० नोव्हेंबर २०१८) रत्नागिरीतल्या खल्वायन संस्थेनं ते सादर केलं. त्या नाटकाचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला हा परिचय...
नार ........

सुंदर मी होणारया नाटकातील एक प्रसंग. (फोटो : वैभव चंद्रकांत दाते)

स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन झाल्यानंतरचा काळ. नंदनवाडीच्या संस्थानिकांचा भव्य राजवाडा अजूनही जुन्या काळाची अदब अन् मुजरे सांभाळत बसलाय. महाराजांची थोरली मुलगी दीदीराजे गेली १० वर्षं खुर्चीला खिळून बसलीय. संस्थानाचे खास डॉक्टर तिच्यावर औषधोपचार करतात. राजेंद्र, प्रसाद आणि बेबीराजे ही तिची भावंडं.

१० वर्षांच्या पांगळेपणामुळे खुर्चीला जखडलेल्या दीदीला आपण बरं होण्याची आशाच उरलेली नाही. २६-२७ वर्षांच्या त्या तरुणीला मृत्यूच आपली सुटका करील, असं खात्रीनं वाटू लागलंय. कवी गोविंदांच्यामृत्यू म्हणजे वसंत माझायांसारख्या कविता तिला आवडू लागल्यात. ती स्वतः सुंदर कविता रचते. निसर्गाच्या सौंदर्याच्या दर्शनाला पारखी झालेली दीदी कित्येक वर्षांपूर्वी तिच्या आईनं संस्थानातल्या लोकांसमवेत केलेल्या दीपदानाच्या रम्य सोहळ्याची स्मृती डोळ्यांपुढे आणते. पावसानं दुथडी भरून वाहणाऱ्या कल्याणी नदीचं पाहून आलेलं दृश्य बेबी स्वतःच्या कल्पनेनं अनुभवू लागते.

दीदी तर अधू; पण त्या वाड्यातल्या कुणालाच त्या चार अवाढव्य भिंतींच्या बाहेर जाता येत नाही. संस्थानाची अमर्याद सत्ता गमावलेल्या महाराजांचा कडकपणा वाढलाय. आपल्या राज्यात घोड्यांचा लगाम धरून अदबीनं उभं राहणाऱ्या मोतद्दाराचा मुलगा बंडा सावंत निवडणूक लढवून असेम्ब्लीचा सदस्य बनलाय, हे महाराजांना सहन होत नाही. लोकशाहीच्या नावानं सामान्य माणसाच्या हाती सत्ता जावी, हे त्यांना मंजूर होत नाही

योगायोग असा, की याच बंडा सावंतवर धाकट्या मुलीचं-बेबीचं प्रेम आहे; पण महाराजांना तो व्यभिचार वाटतो. तिकडे दीदीच्या कविता आवडलेला एक कवी - संजय देशमुख - एकदा तिला भेटायला वाड्यात येतो. तिच्या नकळत तिच्या कविता बेबीनं कवीला पाठवलेल्या असतात. कुणावरती प्रेम केलं, तर उत्कटतेनं करावं, असं कवीचं तत्त्व. खुर्चीला खिळलेल्या दीदीवर तो मनापासून प्रेम करतो; पण तो तिथं आलाय हे कळताच महाराज येतात आणि त्याला हाकलून लावतात. त्यांचा हुकूम ऐकताच एकाएकी अवसान येऊन दीदी खुर्चीतून उठते, उभी राहते. ‘जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार, सुंदर मी होणारअसं काव्य तिला स्फुरतं

दीदी आता चालण्याचा सराव करते; पण ती बरी होत आहे, हे महाराजांना मान्य होत नाही. दरम्यान, त्यांची पुतणी - एका लक्षाधीशाबरोबर लग्न केलेली - भेटीला येते. तिचा नवरा सुरेश हा सुरांच्या आनंदात डुंबणारा; पण बाथटबमध्ये बसल्यासारखं घराच्या उंच भिंतींच्या आत गीतांचा आनंद घेण्याची त्याला आवड. निरनिराळे राग आळवीत तोआसावरीरागाशी दीदीची तुलना करतो.

महाराजांचा कठोरपणा वाढत जातोय. ते मुंबईला गेलेले असतात. तिथून पत्र पाठवून इंग्लंडला जाऊन दीदीवर उपचार करण्याचा बेत प्रकट करतात. त्या वेळी मुलांची आई - संस्थानची राणी - मृत्युपंथाला लागलेली असताना तिच्या काळजीपोटी स्वतःचं ठरलेलं लग्न रद्द करून आयुष्यभर मुलांची आई होऊन राहण्याचं व्रत घेतलेले डॉक्टर आत्मकहाणी सांगतात
इतरांच्या बाबतीत कठोर असणारे आपले वडील आपल्यावर प्रेम कसे करतात याचं दीदीला आश्चर्य वाटत असतं; पण एकेक करून भावंडं आणि डॉक्टर वाडा सोडून जाऊ लागतात आणि आपल्या आईवरचं प्रेम नाहीसं झाल्यावर तिला ही मुलं झाली, हे कळताच वडिलांच्या कठोर मनाची चीड येते

दीदीला पाहिल्यावर सुरांच्या मागून जाण्यासाठी घराच्या भिंतीबाहेर पडणारा सुरेश पुन्हा एकदा सपत्नीक भेटायला येतो. आता सुरेशरूपी सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं. तो मुक्तपणे गाऊ लागतो. ते स्वर कानी पडल्यानं संतापलेले महाराज येऊन त्याला हाकलून लावतात.

आता मात्र महाराजांच्या या हुकूमशाही आणि हृदयशून्य वागणुकीची चीड येऊन संपूर्ण आयुष्य वडिलांच्या सुखासाठी त्यांच्या सोबत घालवण्याचं ठरवलेली दीदी वाड्याबाहेर पडते. तिच्या पावलांत बळ आलेलं असतं. तिला नवे पंख फुटलेले असतात
पुलंच्या समर्थ लेखणीतून प्रकटलेलं हे नाटक मनोहर जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली खल्वायननं ताकदीनं सादर केलं. दीदीच्या भूमिकेत अभिनयकौशल्य पणाला लावणाऱ्या शमिका जोशीनं व्याकुळता, उत्कटता, कल्पनारम्यता यांचं भावदर्शन सुरेख घडवलंय. सुरेशची भूमिका करणाऱ्या हेरंब जोगळेकरांचा रागदारीचा अभ्यास, बेबीच्या भूमिकेतून दीप्ती कानविदेनं प्रकट केलेली तडफ आणि सर्वच कलाकारांनी केलेला नेटका अभिनय या गोष्टींनी नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय! 


कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...